राजाराम साखर कारखान्यातर्फे ऊस उत्पादकांसाठी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ विषयावर व्याख्यान

कोल्हापूर (सलीम शेख ) : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकरी सभासदांसाठी ‘ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन केले होते. या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस उत्पादन वाढवण्यावर भर देण्याच्या उद्देशाने हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे डॉ. अशोकराव कडलग, कारखान्याचे उपाध्यक्ष गोविंद चौगुले, कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांच्यासह संचालक मंडळाच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. कडलग म्हणाले की, “आजच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे ही काळाची गरज आहे. शेतकऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सारख्या तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास एकरी ऊस उत्पादनात मोठी वाढ होऊ शकते.” तसेच, साखर कारखान्यांनीही अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. या व्याख्यानामुळे शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान आणि त्याच्या फायद्यांविषयी माहिती मिळाली, ज्यामुळे भविष्यात ऊस शेतीत मोठा बदल होण्याची शक्यता आहे.