महाराष्ट्र ग्रामीण

२९ ऑगस्टला ‘चलो मुंबई’च्या तयारीसाठी कोल्हापूरमध्ये मराठा समाजाची बैठक!

कोल्हापूर (सलीम शेख ) : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. सरकारच्या उदासीन धोरणाचा निषेध करण्यासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईवर धडक देण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर, सकल मराठा समाज कोल्हापूर जिल्ह्याने मुंबई येथील आंदोलनाच्या तयारीसाठी आज, ५ ऑगस्ट २०२५ रोजी एक महत्त्वाची बैठक घेतली.
या बैठकीत, २९ ऑगस्टच्या ‘चलो मुंबई’ आंदोलनात कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार करण्यात आला. प्रत्येक गावातून किमान एक वाहन घेऊन मुंबईला जाण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे मुंबईच्या आंदोलनात कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा समाजाचा सहभाग लक्षणीय असणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी अनेकदा उपोषण केले असतानाही सरकारने मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केला. सरकारने मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याकडे सातत्याने टाळाटाळ केली असून, यावेळेस सरकारला मराठा समाजाची ताकद दाखवून देण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. २९ ऑगस्ट रोजी मुंबईकडे शेकडो वाहनांसह कूच करून सरकारवर दबाव आणण्याची रणनीती या बैठकीत ठरवण्यात आली.यावेळी सकल मराठा समाज कोल्हापूर जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी हणमंत पाटील, भगवान कोइगडे,मिलिंद चौगले, प्रसाद तारझडे, दत्तात्रय दीक्षित, अमरसिंह पाटील, शिवाजी खोत, रंजना पाटील, चारुशीला पाटील तसेच अनेक पत्रकार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button