सांगली सिव्हिल हॉस्पिटलमधील बदली कामगारांच्या ईपीएफ प्रश्नावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन!

कोल्हापूर ( सलीम शेख) : सांगली जिल्ह्यातील मिरज आणि सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या न्यायालयीन बदली कामगारांचा ईपीएफ फंड जमा होत नसल्याच्या तक्रारीसंदर्भात क्षेत्रीय आयुक्त उमेश बोरकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २ वाजता ईपीएफ कार्यालय, कोल्हापूर येथे आयोजित बैठकीत वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, सांगली यांच्या शिष्टमंडळासोबत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत कामगारांच्या ईपीएफ फंडाबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर बोरकर यांनी या प्रकरणी त्वरित चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच, सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलला प्रत्यक्ष भेट देऊन युनियनचे पदाधिकारी, संबंधित अधिष्ठाता आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून दफ्तर तपासणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
कामगारांच्या फंडाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीने ईपीएफ वेल्फेअर इन्स्पेक्टरची नेमणूक करून सोमवारीपासून चौकशी सुरू करण्याचे आश्वासनही आयुक्त बोरकर यांनी दिले. बैठकीच्या शेवटी युनियनच्या वतीने एक निवेदनही सादर करण्यात आले.
या बैठकीला युनियनचे पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे, सांगली जिल्हा संपर्कप्रमुख संजय भुपाल कांबळे, जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष जगदीश कांबळे, कुपवाड शहर अध्यक्ष राजरत्न बंदेनवर, आणि मिरज हॉस्पिटलमधील प्रमुख कर्मचारी दशरथ गायकवाड, धर्मेंद्र कांबळे, मोहन गवळी, शोभा पोतदार, राकेश कांबळे, सुमन कामत, प्रकाश गायकवाड, बापू वाघमारे, ऋषिकेश कांबळे आदी उपस्थित होते.