फायनान्स कर्मचाऱ्याला मारहाण करून जबरी चोरी करणारे ७ जण जेरबंद!

कोल्हापूर: (सलीम शेख): फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण करून त्याच्याकडील पैसे लुटणाऱ्या पाच आरोपींसह दोन अल्पवयीन मुलांना कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून जबरी चोरीतील ७३ हजार रुपयांसह एकूण ३ लाख १८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी जबरी चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या नेतृत्वाखाली एक तपास पथक तयार केले. या पथकाने करवीर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू केला.
सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीमुळे आरोपी जेरबंद
तपास पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला. याचदरम्यान, पोलीस अंमलदार प्रवीण पाटील, दीपक घोरपडे आणि अरविंद पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की, पोलीस रेकॉर्डवरील आरोपी विजय पुजारी आणि त्याचे साथीदार टेंबलाई मंदिराच्या परिसरात आहेत.
या माहितीच्या आधारे, दि. १३ ऑगस्ट २०२५ रोजी पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने टेंबलाईवाडी येथे सापळा रचून विजय पुजारी आणि त्याच्या इतर साथीदारांना ताब्यात घेतले. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, पण कसून चौकशी केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
कर्ज फेडता न आल्यामुळे रचला कट
आरोपींच्या चौकशीतून समोर आले की, आरोपी अविनाश मोहिते याने एका फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. कर्ज फेडता येत नसल्यामुळे, त्याने आपला मित्र विजय पुजारी याच्या मदतीने कर्ज वसुलीसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्याला लुटण्याचा कट रचला. ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.३० वाजता फायनान्स कंपनीचा कर्मचारी अविनाशकडे आला असता, अविनाशने विजयला फोन करून त्याला लुटण्यास सांगितले. त्यानुसार, विजय पुजारी आणि त्याच्या साथीदारांनी गारगोटी रोड येथे कर्मचाऱ्याचा पाठलाग करून त्याला मारहाण केली आणि त्याच्याकडील पैशांची बॅग लुटली.
पोलीसांनी या गुन्ह्यात विजय पुजारी, स्वरूप सावंत, सुशांत कांबळे, अविनाश मोहिते आणि अनिकेत ताटे यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांना अटक केली. आरोपींकडून चोरीची रक्कम, मोबाईल फोन, आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण ३ लाख १८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विजय पुजारीवर यापूर्वीही जबरी चोरी, मोटारसायकल चोरी आणि मारामारीचे गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, प्रवीण पाटील, दीपक घोरपडे, अरविंद पाटील, अमित सर्जे आणि सतीश सूर्यवंशी यांनी केली.