कोल्हापूर जिल्ह्यात २४ ऑगस्टपर्यंत जमावबंदी लागू; कायदा-सुव्यवस्थेसाठी प्रशासन सतर्क

कोल्हापूर, ११ ऑगस्ट २०२५ (सलीम शेख) : जिल्ह्यात सध्या विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून आंदोलन, मोर्चे, उपोषण यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच आगामी काळात सण, उत्सव, यात्रा यांचा मोठ्या प्रमाणावर उत्साह पाहायला मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत.
बंदी आदेशाची अंमलबजावणी
अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत कलम 37 (1)(अ) ते (फ) आणि कलम 37 (3) अन्वये संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात ११ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ते २४ ऑगस्टच्या रात्री १२ वाजेपर्यंत जमावबंदी लागू केली आहे.
कशावर आहे बंदी?
या आदेशानुसार कोणत्याही प्रकारचा पाच किंवा त्याहून अधिक व्यक्तींचा जमाव, शस्त्र बाळगणे, दहशत निर्माण करणारे कृत्य, घोषणाबाजी, रॅली, मोर्चा, सभा यावर बंदी घालण्यात आली आहे.
कशाला आहे सूट?
– सरकारी अधिकारी व कर्मचारी, जे त्यांच्या कर्तव्यासाठी एकत्र येतात
– पोलीस विभाग किंवा सक्षम प्राधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतलेले कार्यक्रम
– शांततेत साजरे होणारे सण, उत्सव, जयंती, यात्रा
– विवाह, धार्मिक समारंभ, प्रेतयात्रा इत्यादी
प्रशासनाचा इशारा
कोणत्याही प्रकारे बंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी सहकार्य करावे आणि शांतता राखावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.