कुरुंदवाड पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यतेसाठी आमदार चंद्रकांत पाटील यांना निवेदन

कुरूंदवाड (सलीम शेख) : कुरुंदवाड येथील बहुप्रतिक्षित पाणीपुरवठा योजनेस महाराष्ट्र शासनाची प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी डॉ. संजयदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय कृती समितीने आज राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांची कोल्हापूर येथे भेट घेतली. गेली चार महिन्यांपेक्षा अधिक काळ या मागणीसाठी कुरुंदवाडमध्ये सर्वपक्षीय कृती समिती आंदोलन करत आहे.
या भेटीदरम्यान, कृती समितीने चंद्रकांत पाटील यांना या योजनेची तातडीची गरज आणि प्रशासकीय मान्यता मिळण्यास होत असलेल्या विलंबाबद्दल सविस्तर माहिती दिली. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची पार्श्वभूमीही त्यांना समजावून सांगितली.
चंद्रकांत पाटील यांनी कृती समितीचे म्हणणे सहानुभूतीपूर्वक ऐकून घेतले आणि या प्रश्नात लक्ष घालून पाणीपुरवठा योजनेला लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या या आश्वासनामुळे कुरुंदवाडमधील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
यावेळी कृती समितीमधील पप्पू पाटील, तानाजी आलासे, राजू आवळे, तुकाराम पवार, एन डी पाटील, केशव देशपांडे आणि जामदार यांच्यासह इतर प्रमुख सदस्य उपस्थित होते. या सर्वपक्षीय प्रयत्नांमुळे कुरुंदवाडच्या पाणीप्रश्नावर लवकरच तोडगा निघेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.