नांदणी येथील हत्तीणीच्या प्रश्नावर तोडगा, मुख्यमंत्र्यांची ठोस भूमिका!

नांदणी (सलीम शेख ) : नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीच्या देशभरात गाजलेल्या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी नांदणी मठाचे मठाधिपती स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांच्यासह कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.
मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही
मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र शासन नांदणी मठासोबत असल्याची ग्वाही दिली. सर्वोच्च न्यायालयात नांदणी मठ आणि महाराष्ट्र शासन संयुक्तपणे पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकांच्या भावनांचा आदर करून वन विभाग आणि नांदणी मठ यांच्या संयुक्त विद्यमाने मठाच्या आवारातच महादेवीसाठी आवश्यक सुविधा निर्माण केल्या जातील.
हत्तीणीच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक संयुक्त समिती स्थापन करण्याचा विचार केला जाईल. या प्रकरणात ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत, ते मागे घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, अशोकराव माने, सदाभाऊ खोत, राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार प्रकाश आवाडे, जैन अल्पसंख्यांक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या बैठकीमुळे महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीच्या घरवापसीचा मार्ग मोकळा झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.