उपअभियंताकोल्हापूर जिल्हा औद्योगिक विकासाचे ‘मॉडेल’ बनेल: जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर (सलीम शेख ) : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कोल्हापूर जिल्हा औद्योगिक प्रगतीमध्ये एक ‘मॉडेल’ जिल्हा म्हणून पुढे येईल असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, दूरदृष्टीचे छत्रपती शाहू महाराज यांनी औद्योगिक विकासाचा पाया रचला, ज्यामुळे कोल्हापूर आज समृद्धीच्या दिशेने वाटचाल करत आहे.
जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, “कोल्हापुरात असलेल्या तीन मोठ्या आणि दोन-तीन लहान एमआयडीसी क्षेत्रांमध्ये देश-विदेशातील नामांकित कंपन्या कार्यरत आहेत. येथून होणारी निर्यात जिल्ह्याच्या औद्योगिक समृद्धीचे प्रतीक आहे. येथील उद्योग गुणवत्ता वाढ आणि सातत्यपूर्ण प्रगतीसाठी प्रयत्नशील आहेत.” त्यांनी पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी उद्योगांनी घेतलेल्या पुढाकाराचेही कौतुक केले आणि शाश्वत विकासासाठी पर्यावरणाचे संरक्षणही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले कार्यकारी अभियंता आय. ए. नाईक यांनी, उद्योगांमध्येच सकल समृद्धी सामावलेली असून, एमआयडीसी आणि स्थानिक उद्योजकांच्या सहकार्यामुळे कोल्हापूर उद्योग क्षेत्रात अग्रेसर बनल्याचे सांगितले. प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख यांनी सांगितले की, १९६२ मध्ये स्थापन झालेल्या एमआयडीसीमुळेच आज महाराष्ट्र औद्योगिकदृष्ट्या अग्रेसर आहे आणि एक खिडकी योजना राबवण्यात कोल्हापूर विभाग राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.
यावेळी, उपअभियंता अजयकुमार गणपती रानगे आणि बाळासाहेब आनंदा चौगुले यांना २५ वर्षांच्या समर्पित सेवेबद्दल जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते चांदीचे नाणे देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच, गुणवंत विद्यार्थी आणि खेळाडूंचाही गौरव करण्यात आला.
वर्धापन दिनानिमित्त सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले, तर डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलद्वारे आरोग्य तपासणी करण्यात आली