बळीराजा संघटना आणि मनसेकडून राधानगरी PWD कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा मुदाळ तिटा ते सरवडे सोळं, कुर, फेजीवडे रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी!

राधानगरी (सलीम शेख ) : मुदाळ तिटा ते सरवडे सोळं, कुर आणि फेजीवडे दरम्यानच्या रस्त्यांवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे प्रवाशांचे आणि स्थानिक नागरिकांचे हाल होत आहेत. या खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) राधानगरी कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल, असा आक्रमक इशारा बळीराजा संघटना महाराष्ट्र राज्य आणि मनसे उप-अध्यक्ष रणजीत पाटील सरवडे यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन PWD कार्यालय, राधानगरी आणि तहसीलदार, राधानगरी यांना देण्यात आले आहे.
समाजसेवक बळीराजा संघटना महाराष्ट्र राज्य राधानगरी मनसे उपाध्यक्ष पाटील यांनी सांगितले की, “या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकवेळा निवेदने देऊनही PWD विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे.”
यावेळी त्यांच्यासोबत समाजसेवक अस्लम शेख, रफीक, उत्तम, रवी पाटील, सचिन पाटील आदी उपस्थित होते. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन रस्त्यांची दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बळीराजा संघटना आणि मनसेने दिला आहे. स्थानिक नागरिकांनीही या मागणीला पाठिंबा दिला असून, तात्काळ रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.