Uncategorized
Trending

प्रेमसंबंधतील संशयावरून युवकावर चाकू हल्ला। गोकुळ शिरगावमधील प्रकार!

प्रेमसंबंधतील संशयावरून युवकावर चाकू हल्ला।

गोकुळ शिरगाव (सलीम शेख): गोकुळ शिरगाव येथील छत्रपती शाहू महाराज नगरमधील महालक्ष्मी कॉलनीत राहणाऱ्या श्रीनाथ बाप्पा मेलकेरी (वय २७) यांच्यावर गोकुळ शिरगावमधील संशयित आरोपी शुभम झाडे व साहिल वाघमारे यांनी रात्री १० वाजता हल्ला केला. श्रीनाथ मेलकेरी यांच्या आई सावित्री बसाप्पा मेलकेरी (वय ४७, धंदा घरकाम, रा. लक्ष्मी कॉलनी, आझाद नगर गोकुळ शिरगाव, मूळ गाव रा. कन्नाळ जि. बेळगाव) यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेलकेरी कुटुंबात आई, पती आणि मुलगा असे तिघे राहतात. श्रीनाथ हा सॉफ्टवेअर इंजिनिअर असून सध्या घरातूनच कंपनीचे काम करतो. त्याच्या घरापासून थोड्या अंतरावर झाडे यांचे कुटुंब राहते. त्यांच्या घरी ओंकार झाडे, त्यांची पत्नी अक्षता झाडे, दीर शुभम आणि त्याचे आई-वडील राहतात. ओंकार झाडे यांना एक लहान मुलगी असून ती मेलकेरी यांच्या नातवासोबत खेळायला त्यांच्या घरी येत होती. तिच्यासोबत तिची आई अक्षता झाडेही येत असल्यामुळे त्यांचे चांगले संबंध झाले होते. श्रीनाथ आणि अक्षता यांच्यात बोलणे होत असल्याने, गेल्या सहा महिन्यांपासून अक्षता आणि श्रीनाथ यांच्यात प्रेमसंबंध असल्याचा संशय तिच्या सासरच्या लोकांना आला होता. त्यामुळे तिचा पती ओंकार झाडे आणि दीर शुभम झाडे यांनी त्यांच्या घरी येऊन वाद घातला होता आणि श्रीनाथला शिवीगाळ केली होती. त्यानंतर १५ दिवसांपूर्वी श्रीनाथला अक्षताच्या माहेरच्या लोकांनी विक्रमनगर कोल्हापूर येथे बोलावून घेतले होते, तिथेही श्रीनाथला मारहाण झाली होती.
काल, दि. ०४.०२.२०२५ रोजी रात्री १० च्या सुमारास श्रीनाथ त्याच्या घराजवळच्या चौकात रोडच्या कडेला मोबाईल पाहत उभा होता. त्याच परिसरात राहणारे शुभम झाडे आणि साहिल वाघमारे तिथे आले आणि त्यांनी अचानक श्रीनाथला शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. शुभम झाडे (अक्षताचा दीर) याने त्याच्या हातातील चाकूने श्रीनाथवर वार करण्यास सुरुवात केली, तर त्याच्यासोबत असलेल्या साहिल वाघमारेने श्रीनाथला पकडले होते. श्रीनाथ ओरडू लागला, तरी शुभम त्याला चाकूने वार करत होता. श्रीनाथची आई जवळ येत असल्याचे पाहून ते दोघेही पळून गेले. त्यांनी पाहिले असता, त्यांचा मुलगा श्रीनाथ अंधारात पडला होता. त्याच्या डोक्यात, चेहऱ्यावर, पोटावर आणि मानेवर चाकूने वार झाले होते आणि रक्तस्त्राव होत होता. त्यांनी आरडाओरड केली, तेव्हा शेजारी राहणारे लोक जमा झाले आणि त्यांनी श्रीनाथला रिक्षातून सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर येथे पाठवले. रुग्णालयात जात असताना श्रीनाथने त्याच्या आईला शुभम झाडे आणि साहिल वाघमारे यांनी मारल्याचे सांगितले.श्रीनाथ मेलकेरी यांच्यावर सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनच्या निरीक्षक टी. जे. मगदूम आणि पोलीस कॉन्स्टेबल कांबळे या प्रकरणाचा तपास करत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button