कणेरीतील दत्त कॉलनीत उच्च दाबाच्या विद्युत तारांचा धोका : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : कणेरीमधील दत्त कॉलनी परिसरात उच्च दाबाच्या विद्युत तारा घरावर लोंबकळत असल्याने नागरिकांच्या जीव धोक्यात आलेला आहे. या तारांमुळे वारंवार विद्युत उपकरणे जळाल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
दत्त कॉलनीतील दत्त मंदिराच्या परिसरात 1100 kv व्होल्टची मोठी तार घरातील विद्युत तारेवरून गेली आहे. या तारा एकमेकांना स्पर्श करतील, अशी स्थिती आहे. त्यामुळे विद्युत दाब वाढून घरातील उपकरणे जळत आहेत. वारंवार तक्रार करूनही महावितरणने यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही.
या परिसरात लहान मुले खेळतात आणि मंदिरासमोरच त्यांचे पटांगण आहे. तारांच्या धोकादायक स्थितीमुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
या भागात सुमारे ४ टीव्ही, २ फ्रिज, ५-६ पंखे, मीटर आणि मोबाईल चार्जर जळाले आहेत. ज्यामुळे जवळपास एक लाख तीस हजारांचे नुकसान झाले आहे. नागरिकांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. तसेच, या तारांना उंच खांबांवरून घेऊन जावे, अशी मागणी त्यांनी केली आहे, ज्यामुळे त्या एकमेकांना स्पर्श करणार नाहीत.