कागलमध्ये बेपत्ता ऊसतोड मजुराचा मृतदेह सापडला; महिनाभरापूर्वी झाला होता बेपत्ता

कागल (सलीम शेख): कागल तालुक्यातील शाहू कॉलनीजवळच्या उसाच्या शेतात एका बेपत्ता ऊसतोड मजुराचा कुजलेला मृतदेह आढळून आला आहे. दीपक बबन मिस्त्री (वय ४०, रा. पाचोरा, जि. जळगाव) असे मृत मजुराचे नाव आहे. ते गेल्या महिन्याभरापासून बेपत्ता होते.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपक मिस्त्री हे पाचोरा (जि. जळगाव) येथील रहिवासी होते. ते ऊसतोडणीसाठी कागलमध्ये आले होते. ५ फेब्रुवारीपासून ते साखर कारखान्याच्या परिसरातून बेपत्ता झाले होते. याप्रकरणी ट्रकचालक राजेंद्र शंकर पाटील यांनी कागल पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
शाहू कॉलनीजवळच्या उसाच्या शेतात मानवी कवटी आणि कुजलेला मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेहाची ओळख पटवणे कठीण झाले होते. मात्र, पोलिसांनी तपास करून मृतदेह दीपक मिस्त्री यांचा असल्याचे स्पष्ट केले.
मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.
कागल पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.