गडमुडशिंगीत मोकाट रेड्याचा धुमाकूळ, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण !

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : गडमुडशिंगी(तालुका करवीर) गावात एका मोकाट रेड्याने अक्षरशः धुमाकूळ घातला असून, त्याच्या दहशतीने नागरिक भयभीत झाले आहेत. महिला, लहान मुले आणि वृद्ध यांना या रेड्याच्या हल्ल्याची भीती सतावत आहे. गेल्या काही दिवसांपासून हा रेडा गावात मुक्तपणे फिरत असून, रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे.या रेड्याने एका गोठ्यात घुसून गाईवर प्राणघातक हल्ला केला, ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली आणि दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. यापूर्वीही काही नागरिक किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त आहे.
गावात भीतीचे वातावरण, निर्माण झाले आहे.रेड्याच्या दहशतीमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांनी तातडीने ग्रामपंचायतीकडे तक्रार दाखल केली आहे. प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन रेड्याला सुरक्षितपणे पकडून योग्य ठिकाणी हलवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा, ग्रामस्थांना स्वतःच काहीतरी पाऊल उचलावे लागेल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.