उजळाईवाडी-तामगाव रस्त्यासाठी पर्यायी मार्ग मोजणीला सुरुवात!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख): उजळाईवाडी विमानतळाला लागून असलेल्या उजळाईवाडी-तामगाव रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पर्यायी मार्गाच्या मोजणीला सुरुवात झाली आहे. हा रस्ता उजळाईवाडी-तामगाव, नेर्ली विमानतळमार्गे मुडशिंगी, वसगडे लांबोरे मळा ते राज्य
मार्ग क्र. १७७ ला मिळणार आहे.उप विभागीय अधिकारी करवीर विभाग कोल्हापूर यांच्या आदेशानुसार या पर्यायी मार्गाच्या मोजणीचे काम सुरू झाले आहे.
भूकरमापक अमोल खोत, महेश साळोखे, तुकाराम रणदिवे आणि सहाय्यक अधिकारी श्रीकांत सुतार यांनी ०३/०३/२०२५ रोजी प्रत्यक्ष मिळकतीमध्ये उपस्थित राहून मोजणीचे काम चालू केले.या मोजणीच्या वेळी भागातील नागरिक कागदपत्रांसह उपस्थित होते. उपस्थित मिळकत धारकांच्या समक्ष मोजणीचे कामकाज करण्यात आले. या रस्त्याची लांबी ३ किलोमीटर असून रुंदी ६० फूट असणार आहे. के.आय.टी. ब्रीजपासून वसगडेपर्यंत हा रस्ता जाणार आहे.हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर उजळाईवाडी ते वसगडे या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. यावेळी गोकुळ शिरगावमधील तलाठी तुषार भोसले, कोतवाल सुनील गवळी, किरण पाटील, संदीप गवळी, प्रकाश मिठारी, भाईजान अन्सारी, जावेद शेख, स्वप्निल रजपूत आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.