गडमुडशिंगी ग्रामपंचायत क्लार्क अविनाश कांबळे यांचे उपोषण यशस्वी; थकीत पगार आणि बोनस लवकरच मिळणार!

गडमुडशिंगी (सलीम शेख): ग्रामपंचायत गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे आकृतीबंध कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले अविनाश पांडुरंग कांबळे यांनी ग्रामपंचायत सरपंच अश्विनी शिरगावे व ग्रामविकास अधिकारी रोहिदास चौगुले यांनी जाणीवपूर्वक मागील वर्षभरापासून पगार व बोनस दिला नसल्याने, तो मिळावा या मागणीसाठी सुरू केलेले उपोषण चौथ्या दिवशी मागे घेतले. जिल्हा परिषदेचे गटविकास अधिकारी मेश्राम यांनी नारळपाणी देऊन कांबळे यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. कांबळे यांना सहीसाठी मस्टर (हजेरी रजिस्टर) उपलब्ध करून देण्यात आले असून, थकीत पगार व बोनस देण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.
गेल्या वर्षभरापासून पगार न मिळाल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या कांबळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. परंतु समाधानकारक तोडगा निघत नसल्याने कांबळे यांनी उपोषणाचा निर्णय घेतला होता. त्यांच्या समर्थनार्थ ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपोषण मागे घेण्यासाठी राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे प्रतिनिधी दत्ता आवळे आणि आमदार अमल महाडिक यांचे प्रतिनिधी मकरंद बोराडे यांनी विशेष प्रयत्न केले. छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक तानाजी पाटील यांनीही या प्रकरणात लक्ष घालत उपोषण मागे घेण्यासाठी प्रयत्न केले. पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी पाटील आणि विस्तार अधिकारी नलवडे हे देखील यावेळी उपस्थित होते.
उपोषण मागे घेतल्यानंतर कांबळे म्हणाले, “माझ्या हक्कासाठी मी हे उपोषण केले होते. मला न्याय मिळाला आहे.गटविकास अधिकाऱ्यांनी मला थकीत पगार आणि बोनस लवकरच देण्याचे आश्वासन दिले आहे. मी त्यांचे आभार मानतो.”
यावेळी गटविकास अधिकारी श्री. मेश्राम म्हणाले, “कांबळे यांच्या मागण्या योग्य आहेत. त्यांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे. आम्ही त्यांना थकीत पगार आणि बोनस लवकरच देऊ.”
कांबळे यांच्या या लढ्याला यश मिळाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.