कागलमध्ये गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांचा अभिनव उपक्रम!

कागल (सलीम शेख) : कागल शहर आणि परिसरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कागल पोलिसांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पोलिसांनी शहरातील ४७ हून अधिक ठिकाणी क्यूआर कोड पेट्रोलिंग यंत्रणा कार्यान्वित केली आहे. यामुळे गुन्हेगारी घटनांना आळा बसेल आणि पोलिसांचे २४ तास पेट्रोलिंग सुरू राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या यंत्रणेअंतर्गत, पोलिसांनी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी आणि ग्रामीण भागातील गर्दीच्या ठिकाणी क्यूआर कोड बसवले आहेत. यामध्ये कागल स्टँड, हिंदुराव घाटगे हायस्कूल, खर्डेकर चौक, गैबी चौक, जनावरांचा दवाखाना, छत्रपती शिवाजी महाराज चौक, शाहू उद्यान, बापूसाहेब महाराज चौक, सांगाव नाका, यशवंत किल्ला, जवाहर नवोदय विद्यालय, ग्रामपंचायत मौजे सांगाव कसबा सांगाव, गणेशनगर, दूधगंगा विद्यालय, कमल आनंद पार्क, दावणे गल्ली, बेघर वसाहत, शिवाजी चौक, डी. आर. माने महाविद्यालय, जयसिंगराव पार्क, जनता राजा चौक, एसटी डेपो, ग्रामीण रुग्णालय, पाझर तलाव, कागल न्यायालय, तहसीलदार कार्यालय, शाहू कॉलनी, विद्युत वितरण कंपनी, येशीला पार्क, मुरगूड नाका, अनंत रोटो, आरटीओ चेक पोस्ट नाका, लक्ष्मी मंदिर, एसटी स्टँड बानगे, म्हाकवे, केनवडे, व्हनाळी, बाचणी, बेलवळे बुद्रुक, पोस्ट ऑफिस, मसोबा मंदिर, नदी किनारा सिद्धनेर्ली अशा एकूण ४७ ठिकाणांचा समावेश आहे.
यंत्रणेचे फायदे या यंत्रणेमुळे पोलिसांना पेट्रोलिंग करणे सोपे होईल आणि ते गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवू शकतील.सततच्या पेट्रोलिंगमुळे गुन्हेगारी घटनांना आळा बसेल.
नागरिकांना सुरक्षित वाटेल.
कागल शहर आणि परिसरात घरफोड्या, दुचाकी चोरी, दोन गटांतील भांडणे यांसारख्या गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी २४ तास पेट्रोलिंग सुरू केले आहे. पोलिस क्यूआर कोड स्कॅन करून वरिष्ठांना माहिती पाठवतील. यामुळे गुन्हेगारांवर लक्ष ठेवणे सोपे होईल.कागल शहर आणि परिसरात आणखी पेट्रोलिंग पॉईंट वाढवण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे. यामुळे गुन्हेगारीवर अधिक प्रभावीपणे नियंत्रण ठेवता येईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.