कागल तालुक्यात विद्युत केबल चोरी प्रकरणी दोघांना अटक!

कागल (सलीम शेख): कागल तालुक्यातील आनूर गावात शेतातील विद्युत केबल चोरी प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तानाजी हरिसिंग कळाप्पा पोवार (वय ३०) आणि सादेव लक्ष्मण दळवाळे (वय ३०) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही मूळचे कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील ताळीकोटी येथील रहिवासी आहेत. सध्या ते कागल तालुक्यातील केनवडे फाटा येथे राहत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुयश सुभाष चौगुले (वय ४२) यांच्या शेतातील पाण्याच्या मोटारीला जोडलेल्या सुमारे १०० फूट आणि ५० फुटांच्या दोन अशा एकूण ६००० रुपये किमतीच्या काळ्या रंगाच्या विद्युत केबलची चोरी झाली होती. ही घटना २० मार्च २०२५ रोजी मध्यरात्री १२.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी तातडीने तपास करून दोन्ही आरोपींना २० मार्च रोजी रात्री ८.५० वाजता अटक केली. त्यांच्याकडून चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास कागल पोलीस करत आहेत.