एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या परप्रांतीय तरुणास अटक!

कोल्हापूर (सलीम शेख): उचगाव (ता. करवीर) जवळील निगडेवाडी येथील मुख्य रस्त्यावरील एटीएम मशीन फोडून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या परप्रांतीय तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. अवघ्या दोन दिवसात या गुन्ह्याचा छडा लावून पोलिसांनी संशयितास जेरबंद केले.उचगाव जवळील निगडेवाडी येथील मुख्य रस्त्यावर डीसीबी बँकेचे एटीएम आहे.
बुधवारी रात्री तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्याने एटीएम मशीनच्या बाहेरील सीसीटीव्हीवर स्प्रे मारला.चोरट्याने एटीएम मशीनचा खालील बाजूचा पत्रा उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न केला.
या गुन्ह्याची माहिती मिळताच, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना सूचना दिल्या.पोलिसांनी तपास सुरू केला असता, पोलीस अंमलदार महेंद्र कोरवी यांना मिळालेल्या माहितीनुसार, संशयित गोविंदा राममिलन निसाद (वय १९ वर्षे, रा. राममिलन ग्राम-बडगो, बौरव्यास, बखिरा खास, संत कबीरनगर, उत्तर प्रदेश, सध्या रा. उचगाव जवळील निगडेवाडी, ता. करवीर) याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यासाठी वापरलेले ग्रायंडर मशीन, स्प्रे, कपडे, इतर साहित्य आणि मोबाईल असा एकूण १७,४०० रुपयांचा माल जप्त केला. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस अंमलदार महेंद्र कोरवी, कृष्णात पिंगळे, वैभव पाटील, विशाल खराडे, योगेश गोसावी, प्रविण पाटील, प्रदीप पाटील, गजानन गुरव, संतोष बरगे, परशुराम गुजरे, अरविंद पाटील, शुभम संकपाळ, अमित गर्जे, अमित मदनि, शिवानंद मठपती यांनी या कारवाईत सहभाग घेतला.