कोल्हापूर हद्दवाढीला २० गावांचा कडकडीत बंद!

कोल्हापूर (सलीम शेख) : कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीला विरोध करण्यासाठी रविवारी (दि. २३ मार्च) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर, हद्दवाढीतील २० गावे बंद ठेवण्याचा निर्णय सर्वपक्षीय कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढ विरोधी समितीने घेतला आहे. त्यानुसार, सोमवार दिनांक २४ मार्च रोजी शिरोली, नागांव, वळिवडे, गांधीनगर, मुडशिंगी, सरनोबतवाडी, गोकुळ शिरगांव, पाचगांव, मोरेवाडी, उजळाईवाडी, नवे बालिंगे, कळंबे तर्फ ठाणे, उचगांव, वाडीपीर, आंबेवाडी, वडगणे, शिये, शिंगणापूर, नागदेववाडी, कंदलगांव, शिरोली एमआयडीसी आणि गोकुळ शिरगांव एमआयडीसी ही गावे पूर्ण दिवस बंद राहतील.
या आंदोलनात २० गावांमधील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हद्दवाढीला गावांचा असलेला तीव्र विरोध या बंदमधून दिसून येईल, असा निर्धार समितीने व्यक्त केला आहे.सर्व दुकाने, बाजारपेठा आणि व्यावसायिक आस्थापना बंद राहतील. शाळा आणि महाविद्यालये बंद राहण्याची शक्यता आहे. सार्वजनिक वाहतूक सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
गावातील नागरिकांनी बंदमध्ये सहभागी होऊन हद्दवाढीला विरोध दर्शवावा, असे आवाहन समितीने केले आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढीच्या मुद्द्यावरून संघर्ष तीव्र होत असलेला पाहायला मिळतोय. आमदार राजेश क्षीरसागर यांनी हद्दवाढीला समर्थन दिलं आहे. तर आमदार चंद्रदीप नरके यांनी याला कडाडून विरोध केला आहे. कोल्हापुरात हद्दवाढ विरोधी कृती समिती आणि हद्दवाढ समर्थन कृती समिती दोघांकडूनही आंदोलने सुरु आहेत.