कागल पोलिस ठाण्यात व्यापाऱ्यांसाठी सुरक्षा बैठक संपन्न!

कागल (सलीम शेख) : कागल शहरातील व्यापाऱ्यांसाठी सुरक्षा विषयक मार्गदर्शन करण्यासाठी कागल पोलिस ठाण्यात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी व्यापाऱ्यांना सुरक्षित व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांची माहिती सांगितली.सुरक्षितता विषयी माहिती देताना लोहार म्हणाले की दुकानदारांनी रात्रीच्या वेळी स्पष्ट चित्र दिसतील असे सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत.
दुकानात जास्त रोख रक्कम ठेवू नये.दिवसभरातील जमा झालेली रक्कम शक्यतो त्याच दिवशी बँकेत जमा करावी.
अग्निशमन सिलिंडर आणि फायर अलार्म यांसारखी फायर सेफ्टी उपकरणे दुकानात ठेवावीत. अनोळखी व्यक्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवावे व संशयास्पद हालचाली दिसल्यास पोलिसांना माहिती द्यावी.
आर्थिक सावधगिरी बाळगावी यासाठी डिजिटल व्यवहारांमध्ये काळजी घ्यावी.कोणत्याही अनोळखी लिंक, क्यूआर कोड किंवा कॉलवर विश्वास ठेवू नये.कोणताही ओटीपी, पिन किंवा पासवर्ड कोणासोबतही शेअर करू नये. सुरक्षित इंटरनेट कनेक्शनचा वापर करावा. खोट्या नोटा ओळखण्याचे प्रशिक्षण घ्यावे आणि यासाठी मशीन लावावी.प्रत्येक व्यवहाराची नोंद ठेवावी आणि ग्राहकांना बिल देणे अनिवार्य करावे.व्यापारी संघटनेची नियमित बैठक घ्यावी.पोलिस ठाणे, रुग्णालय, अग्निशमन दल आणि जवळच्या व्यापारी मित्रांचे आपत्कालीन संपर्क क्रमांक दुकानात ठेवावेत.
ग्राहकांनी आणि व्यापाऱ्यांनी पार्किंगचे नियम पाळावेत अशा सुचना दिल्या.
या बैठकीला शहरातील अनेक व्यापारी उपस्थित होते.