हलसववडे येथे सावकाराच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत, हलसवडे गावात सावकाराच्या त्रासाला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागोंडा शंकर पाटील (वय ५२) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी क्रमांक १ बाबासो पारीसा लबाजे याने बेकायदेशीर सावकारी व्यवसाय करत जुलै २०२२ मध्ये नागोंडा पाटील यांना दरमहा दोन टक्के व्याजाने पाच लाख रुपये दिले होते. या रकमेला सुरक्षितता म्हणून नागोंडा पाटील यांची १९ गुंठे शेती नावावर करून घेतली. त्यानंतर, आरोपीने नागोंडा पाटील यांच्याकडे २९ लाख रुपयांची मागणी केली. आरोपी क्रमांक २ मधु मगदुम बसाना याने देखील नागोंडा पाटील यांच्याकडून हात उसने घेतलेले २,५०,००० रुपये परत केले नव्हते. दोन्ही आरोपी कागल तालुक्यातील आहेत.या त्रासाला कंटाळून नागोंडा पाटील यांनी २४ मार्च २०२५ रोजी सकाळी नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास टी जे मगदूम मॅडम करत आहेत.