इंडोकाऊंट मिल कामगारांच्या आंदोलनाला यश; रिपब्लिकन पक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीने तोडगा!

हातकणंगले (सलीम शेख): इंडोकाऊंट मिलमधील 200 ते 250 कामगारांना कायमस्वरूपी (परमनंट) करण्याची मागणी करत गेल्या 12-13 दिवसांपासून सुरू असलेल्या कामगारांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. रिपब्लिकन पक्ष आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीने या आंदोलनावर तोडगा निघाला.
हे आंदोलन मिलच्या दारात, हातकणंगले पोलीस स्टेशन आणि तहसीलदार कार्यालयासमोर सुरू होते. आंदोलन सुरू असताना कंपनी प्रशासनाने दबावतंत्राचा वापर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, असा आरोप कामगारांनी केला आहे.
29 मार्च 2025 रोजी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सचिव सतीश माळगे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कामगारांना पाठिंबा दर्शवला. तसेच, कंपनी प्रशासनाशी चर्चा करून कामगारांच्या मागण्या मान्य न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. यानंतर, कंपनी प्रशासनाने चर्चेअंती 200 ते 250 कामगारांना एका वर्षाच्या आत कायमस्वरूपी करण्याचे लेखी आश्वासन दिले.
या आंदोलनात पंचायत समितीचे उपसभापती प्रवीण पाटील, आळते ग्रामपंचायत सदस्य जावेद मुजावर, रिपब्लिकन सेनेचे शिरीष थोरात आणि रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सचिव सतीश माळगे यांनी मध्यस्थी केली. स्थानिक कार्यकर्ते, छायाचित्रकार, पत्रकार आणि सागर खोत, दीपक शिंदे, शशिकांत घाटगे, संदीप बाचणकर, नेमिनाथ वसगडे, शंकर गावडे, सचिन बिरंजे, शब्बीर मुजावर, प्रतीक तोरकर, काशिनाथ भिसे यांच्यासह मिल कामगारांनी सक्रिय सहभाग घेतला.
रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले आणि जिल्हा सचिव सतीश माळगे यांनी कंपनी प्रशासनाचे आभार मानले आणि मिल कामगारांचे अभिनंदन केले.