भूखंड हडपणाऱ्या सरपंचांना पाठीशी घालण्याचा आरोप; कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सीईओंच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सुनील गायकवाड यांचे उपोषण

कोल्हापूर (सलीम शेख): तिळवणी (ता. हातकणंगले) येथील भूखंड हडपणाऱ्या सरपंच राजेश बाबासाहेब पाटील यांना पाठीशी घालून कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. हे कोल्हापूर जिल्ह्याचे ‘बीड’ करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप सुनील गायकवाड यांनी केला आहे. तसेच, ‘भावी वाल्मिकी कराड’ जन्माला घालणाऱ्या सीईओंच्या मनमानी व अन्यायी कार्यपद्धती विरोध म्हणत सुनील गायकवाड यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर अन्न, पाणी त्याग लक्षवेधी उपोषण केले.
या उपोषणादरम्यान सुनील गायकवाड यांनी सीईओंवर अनेक गंभीर आरोप केले. त्यांनी विचारले की, “भूखंड हडपण्याच्या प्रकरणात सीईओंचा वाटा किती आहे? सीईओ कोणासाठी नोकरी करतात? जनतेसाठी की सरपंचांसाठी? सीईओंना गलेलठ्ठ वेतन, बंगला, गाडी, नोकर, अत्याधुनिक मोबाईल या सुविधा शासन का देते? तक्रारी जलदपणे सोडवण्यासाठीच ना? मग सीईओ याची उत्तर का देत नाहीत? सीईओ निरोप न ठेवता कार्यालयातून अचानक गायब का होतात? ते कोठे जातात? दप्तर दिरंगाई, सेवा हमी, जनतेच्या तक्रार निवारणासाठी १०० दिवसांचा कालबद्ध कार्यक्रम, अचूक व वेगवान प्रशासन कोल्हापूर जिल्ह्याला लागू आहे की नाही?”
याशिवाय, पत्रांना उत्तर न देणाऱ्या, मनमानी करणाऱ्या, कर्तव्यात कसूर करणाऱ्या ग्रामसेविका सुजाता कुमार कांबळे, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांच्यावर सीईओ कारवाई का करत नाहीत? असे अनेक प्रश्न सुनील गायकवाड यांनी उपस्थित केले.
त्यांनी सांगितले की, “२० फेब्रुवारी २०२४ रोजी मी उपोषणास बसलो होतो, तेव्हा मला जलद न्यायाची हमी देऊन उपोषण मागे घेण्यास लावले. परंतु, अद्यापही मला न्याय मिळालेला नाही.”
सुनील भिमराव गायकवाड, मु.पो. तिळवणी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर यांनी एक दिवस उपोषण करून आपले मनोगत व्यक्त केले.