कणेरीवाडी ग्रामपंचायतीचा विकासकामांवरील तक्रारींना सडेतोड जबाब; आरोप निराधार असल्याचा दावा!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : कणेरीवाडी (ता. करवीर) ग्रामपंचायतीने गावातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती विकासासाठी केलेल्या कामांवरील तक्रारी खोट्या आणि निराधार असल्याचा सडेतोड जबाब दिला आहे. ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून या प्रकरणातील वस्तुस्थितीची माहिती दिली आहे.
ग्रामपंचायतीने दिलेल्या माहितीनुसार, कणेरीवाडीतील बौद्ध वस्ती, संत रोहिदास वस्ती, आण्णाभाऊ साठे वस्ती आणि बौद्ध वस्ती, महालक्ष्मी नगर या चार वस्त्यांना समाज कल्याण विभागाची अधिकृत मंजुरी मिळाली आहे. या वस्त्यांमध्ये विकासकामे करण्यासाठी शासनाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आले होते. या कामांसाठी तयार केलेले अंदाजपत्रक हे प्रत्यक्ष वस्तीच्या गरजेनुसार तयार करण्यात आले होते आणि प्रत्यक्ष कामेही त्याच वस्तींमध्ये करण्यात आली आहेत. पंचायत समितीच्या बांधकाम विभागाने प्रत्यक्ष जागेवर येऊन कामांची मोजणी केली असून, आवश्यक पडताळणीनंतरच ठेकेदारांना देयके अदा करण्यात आली आहेत. यापूर्वीही जिल्हा परिषदेच्या समितीने दोन वेळा या कामांची तपासणी केली असून, त्यात कोणताही गैरव्यवहार आढळलेला नाही, उलट काही ठिकाणी नियोजित कामांपेक्षा जास्त काम झाल्याचे दिसून आले आहे, असा दावा ग्रामपंचायतीने केला आहे.
ग्रामपंचायतीने गावात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य पुरवणारे कणेरीवाडी हे महाराष्ट्रातील एकमेव गाव आहे. तसेच लोकसहभागातून स्वागत कमान उभारणे आणि वृक्षारोपण करणे यांसारखी कामेही ग्रामपंचायतीने यशस्वीपणे केली आहेत. राजकीय आकसापोटी काही तक्रारदार वारंवार खोट्या तक्रारी करत असून, त्यामुळे गावाची नाहक बदनामी होत आहे. ग्रामपंचायतीने या कामांची फेरचौकशी करण्याची तयारी दर्शवली असून, तक्रारदारांना योग्य समज देण्याची विनंती केली आहे.
ग्रामपंचायत सदस्यांची प्रतिक्रिया:
* रूपाली अशोक माने (मागासवर्गीय सदस्य, ग्रामपंचायत कणेरीवाडी): “कणेरी वाडी गावच्या विरोधात अविनाश शिंदे यांनी केलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत. त्यांनी गावची कोणतीही माहिती न घेता जिल्हा परिषद कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली आहे. गावामध्ये मागासवर्गीय एकूण २२६ कुटुंबे असून, माझ्या प्रभागांमध्ये ग्रामपंचायतीचा निधी योग्यरित्या वर्ग केलेला आहे.”
* समाधान सोनुले (अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त सामाजिक संघटना, कणेरी वाडी): “आमच्या गावामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त सामाजिक संघटना कणेरी वाडी कार्यरत आहे. मागील वीस ते पंचवीस वर्षांपासून आम्ही या गावचे रहिवासी आहोत. आम्हाला दरवर्षी ग्रामपंचायतीमार्फत विविध विकास सुविधा पुरवल्या जातात. तसेच गावामध्ये सर्व धर्मातील जातीतील मागासवर्गीय रहिवासी आहेत.”
* सीमा कृष्णात खोत (उपसरपंच, कणेरीवाडी): “आमच्या गावावर झालेला आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. तक्रारदार अविनाश शिंदे हे कणेरीवाडी गावचे रहिवासी नाहीत. तरीदेखील त्यांनी चुकीच्या माहितीच्या आधारे तक्रार दाखल केली आहे. पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद यांच्याकडून गावातील चारही दलित वस्त्यांना मान्यता आहे. तसेच शासनाकडून या वस्त्यांसाठी निधीही मंजूर करण्यात आलेला आहे. या वस्त्या अस्तित्वात नसत्या, तर शासनाने या वस्त्यांसाठी निधी दिला नसता.”