पन्हाळ्याजवळ वाघबीळ येथे दोन गटात तुंबळ हाणामारी, तीन दुचाकींची तोडफोड!

पन्हाळा (सलीम शेख) : कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील वाघबीळ येथे दोन तरुणांच्या गटात जोरदार हाणामारी झाली. बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या हाणामारीत तीन दुचाकी गाड्यांची तोडफोड झाली, तसेच एका चहाच्या टपरीवरील साहित्याचेही नुकसान झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, वाघबीळ येथे दोन गटांमध्ये काही कारणावरून वाद सुरू होता. या वादाचे रूपांतर लवकरच हाणामारीत झाले. कोल्हापूरकडील गटातील तरुणांनी काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली, तर दुसऱ्या गटातील तरुणांनी तेथे पडलेले दगड उचलून त्यांच्यावर फेकण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या दगडफेकीमुळे कोल्हापूरच्या तरुणांच्या गटाने आपल्या दुचाकी सोडून तेथून पळ काढला. या झटापटीत दोन्ही गटांकडून एकमेकांच्या दुचाकींची तोडफोड करण्यात आली. तसेच, घटनास्थळाजवळील एका चहाच्या टपरीवरील साहित्याचीही मोडतोड झाली.
या घटनेनंतर वाघबीळ चौकात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. घटनेची माहिती मिळताच कोडोली आणि पन्हाळा पोलीस स्टेशनचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे वाघबीळ चौकाला काही वेळेसाठी पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.
कोडोली पोलिसांनी घटनास्थळावरून चहा टपरीचालक आणि एक दुचाकी मेकॅनिक अशा दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील युवकांची माहिती घेऊन त्यांची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत. तसेच, मोडतोड झालेल्या दुचाकी गाड्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.
उपस्थित असलेल्या लोकांमध्ये या हाणामारीतील सर्व तरुण वाघबीळ परिसरातील जाफळे, बांबरवाडी आणि कोल्हापूरचे असल्याची चर्चा सुरू होती. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.