कोल्हापूर जिल्हास्तरीय गुंतवणूकदार परिषदेत उत्कृष्ट कर्ज मंजुरीसाठी एस.बी.आय.चे लोन मॅनेजर सुरज डकरे यांना पुरस्कार!

कोल्हापूर (सलीम शेख): दि. १२ कोल्हापूर जिल्हास्तरीय गुंतवणूकदार परिषद २०२५ मध्ये शासनाच्या विविध योजनांसाठी उत्कृष्ट कर्ज मंजुरी केल्याबद्दल कोल्हापूर शहरातील दसरा चौक येथील भारतीय स्टेट बँकेच्या (एस.बी.आय.) मुख्य शाखेचे लोन मॅनेजर सुरज रघुनाथ डकरे यांना सर्वोत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उद्योगमंत्री उदय सामंत आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश अबिटकर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जाधववाडी येथे राहणारे सुरज डकरे हे कोल्हापूरच्या दसरा चौकातील एस.बी.आय.च्या मुख्य शाखेत लोन मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात ग्राहकांबद्दल दाखवलेला आदर, विश्वास आणि लोन क्षेत्रातील उत्कृष्ट कामामुळे अल्पावधीतच चांगली ओळख निर्माण केली आहे. यापूर्वी त्यांनी पुणे, शिरोळ आणि गारगोटी यांसारख्या अनेक शाखांमध्येही यशस्वीरित्या काम केले आहे.
हा पुरस्कार म्हणजे सुरज डकरे यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाची पावती आहे, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या. पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचे सर्व स्तरांतून आणि मित्रमंडळींकडून अभिनंदन करण्यात आले.