नेर्ली-तामगाव-उजळाईवाडी रस्त्याची दुरवस्था; बाजूच्या पट्ट्या खचल्याने अपघातांचा धोका!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ): नेर्ली-तामगाव ते उजळाईवाडी या महत्त्वाच्या रस्त्याची सध्या मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या पट्ट्या मोठ्या प्रमाणात खचल्याने वाहनचालकांसाठी हा मार्ग धोकादायक बनला आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना याचा मोठा फटका बसत असून, रात्रीच्या वेळी आणि दिवसादेखील अनेक अपघात झाले आहेत. या धोकादायक परिस्थितीमुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रस्त्याच्या बाजूच्या पट्ट्या खचल्यामुळे दुचाकी चालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही आणि त्यांची वाहने घसरतात. रात्रीच्या अंधारात तर हा धोका अधिकच वाढतो. गेल्या काही दिवसांमध्ये या मार्गावर दुचाकी घसरून अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत आणि काही जण गंभीर जखमीही झाले आहेत.
या गंभीर परिस्थितीमुळे नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासनाने या धोकादायक रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, तसेच रस्त्यावरील पडलेले खड्डे त्वरित बुजवावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने या मागणीची दखल घेणे अत्यंत आवश्यक आहे