करवीर संस्थापिका छत्रपती महाराणी ताराबाई यांच्या समाधी जीर्णोद्धारासाठी इतिहासप्रेमींचे कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारक येथे आंदोलन!

कोल्हापूर (सलीम शेख ) : करवीर संस्थापिका छत्रपती महाराणी ताराबाई यांच्या संगममाहुली (सातारा) येथील समाधीच्या जीर्णोद्धाराच्या मागणीसाठी करवीर संस्थान संस्थापिका छत्रपती महाराणी ताराबाई समाधी जीर्णोद्धार समितीने आज (१६ एप्रिल २०२५) कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारकाजवळ आंदोलन केले.
इतिहासप्रेमींनी २७ डिसेंबर २००६ रोजी संगममाहुली येथे दिवसभर काम करून २० फूट वाळूखाली दबलेली महाराणी ताराबाईंची समाधी शोधून काढली होती आणि तिची योग्य प्रतिष्ठापना करून पूजा केली होती. त्यानंतर १७ एप्रिल २०१६ रोजी तत्कालीन सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांच्याकडे विजय देवणे यांनी समाधीच्या जीर्णोद्धारासाठी परवानगी मागितली आणि राज्य शासनाकडे निधीची मागणी केली होती.
या मागणीनुसार, २९ मार्च २०१७ रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात अधीक्षक अभियंता संभाजी माने यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत समाधी जीर्णोद्धाराचा ढोबळ आराखडा दोन दिवसांत तयार करण्याचे निश्चित झाले आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने ९२.४६ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले. २४ एप्रिल २०१७ रोजी पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली सातारा येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत सादर करण्यात आला. त्यावेळी समाधीचे जतन करणे शासनाचे कर्तव्य असून, ऐतिहासिक वारसा जतन करणे महत्त्वाचे असल्याने स्मारकासाठी निधी देण्याची शिफारस सभागृहाने एकमताने शासनाकडे केली.
परंतु, २०१७ पासून समिती सातत्याने पाठपुरावा करत असूनही समाधीची स्थिती आजही जैसे थे आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवप्रेमींनी आणि समिती सदस्यांनी आज कोल्हापुरात आंदोलन करून महाराष्ट्र शासनाकडे तातडीने समाधी जीर्णोद्धाराचे काम सुरू करण्याची मागणी केली.
या आंदोलनात विजय शामराव देवणे यांच्यासह संजय पवार ,हर्षल सुर्वे अरुण अबदागिरी, सरदार तिप्पे, विवेक काटकर, दिनेश साळोखे, संजय पटकरे,,तोफिक मल्लानी, शाहीर राजू राऊत, उदय नारकर, सतीश चंद्र कांबळे, चंद्रकांत यादव, राजू जाधव, बाबा महाडिक अनेक शिवप्रेमी आणि समिती सदस्य सहभागी झाले होते. त्यांनी शासनाला त्वरित कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.