पिंपळगावात मिरवणुकीत गोंधळ, पोलीस ठाण्यासमोर कार्यकर्त्यांचा ठिय्या!

कागल (सलीम शेख) : कागल तालुक्यातील पिंपळगाव येथे 18 एप्रिल 2025 रोजी रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत गोंधळ झाला. मिरवणूक रात्री 10 वाजता सुरू असताना, समारोप करताना दोन गाणी लावण्यावरून वाद झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती आणि कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे की, यावेळी कागल पोलीस ठाण्याचे वैभव जमादार यांनी घटनास्थळी भेट दिली आणि डीजे साहित्य जप्त केले तसेच पैशांची मागणी केली असा आरोप कार्यकत्यांनी केला आहे.जमादार यांना निलंबित करावे अशी मागणी मांडत ठिय्या आंदोलन चालू होते.
या घटनेच्या निषेधार्थ, आज 19 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजता पिंपळगावमधील महिला आणि युवकांनी मोठ्या संख्येने कागल पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली आणि जोरदार घोषणाबाजी केली. माजी नगरसेवक प्रकाश गाडेकर यांनी आंदोलक कार्यकर्त्यांची भेट घेतली, त्यानंतर कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले.
दुपारी 12.30 च्या सुमारास आंदोलकांनी कागल पोलीस ठाण्याच्या समोर चूल मांडून भात शिजवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. या घटनेमुळे पिंपळगाव आणि कागल परिसरात खळबळ उडाली आहे. पुढील कार्यवाहीसाठी पोलीस प्रशासनाकडून काय पाऊले उचलली जातात याकडे लक्ष लागले आहे. यावेळी अभिजीत कांबळे,सागर शिंदे, माजी नगरसेवक प्रकाश गाडेकर, उत्तम कांबळे,विवेक लोटे, अजित कांबळे, गणेश कांबळे, प्रमोद कांबळे, प्रमोद सोनुले, संदिप नेर्ले,राज कांबळे,अक्षय कांबळे, गौतम गाडेकर,बाबासो कागलकर यासह मोठ्या प्रमाणावर गावातील महिला व पुरुष मंडळी उपस्थित होती.