महाराष्ट्र ग्रामीण
एनएच ४ नूतनीकरण कामादरम्यान अपघात, सुदैवाने टळली मोठी दुर्घटना!

कणेरीवाडी (सलीम शेख) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ च्या नूतनीकरणाचे काम सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक वळवण्यात आली आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, रविवारी सायंकाळी ६.२१ वाजता कणेरीवाडी फाट्याजवळ एक अपघात झाला.
कणेरीवाडीच्या दिशेने जात असलेल्या एका चारचाकी वाहनाच्या समोर अचानक मालवाहतूक करणाऱ्या रिक्षाने ब्रेक लावला. त्यामुळे रिक्षातील लोखंडी सी चॅनेल उसळून चारचाकी गाडीच्या समोरील काचेवर पडले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अपघातानंतर दोन्ही वाहनधारकांनी आपापसात चर्चा करून प्रकरण सामोपचाराने मिटवले. या घटनेची नोंद आज सायंकाळपर्यंत गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात झालेली नाही. राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे वाहनचालकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.