कागलमध्ये जागतिक हिवताप दिन विविध उपक्रमांनी साजरा!

कागल (सलीम शेख) : कागल शहरात २५ एप्रिल रोजी जागतिक हिवताप दिन विविध जनजागृतीपर उपक्रमांनी साजरा करण्यात आला. ग्रामीण रुग्णालय कागल आणि नगरपरिषद कागल यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांमध्ये हिवतापाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालय कागल येथे आयोजित कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णांना तसेच उपस्थित नागरिकांना हिवतापाची कारणे, लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपायांची माहिती दिली.
यानंतर, नगरपरिषद कागल येथे हिवताप दिनानिमित्त एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हिवतापाच्या नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजनांवर विचारविनिमय करण्यात आला.
कागल परिसरातील वाय. डी. माने कॅम्पस येथील नर्सिंग कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थी परिचारिकांसाठी विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सत्रात त्यांना हिवतापाबद्दल सखोल माहिती देण्यात आली, जेणेकरून भविष्यात आरोग्य सेवा देताना त्यांना याचा उपयोग होईल.
जागतिक हिवताप दिन यशस्वीपणे साजरा करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय कागलमधील वैद्यकीय अधिकारी डॉ. टोणपे, डॉ. सुलभा पाटील, सहाय्यक अधीक्षक राम सातवेकर, आरोग्य निरीक्षक आर. पी. दांगट, आरोग्य सेवक प्रकाश पवार, प्रतीक पाटील, सचिन देशमुख यांनी सक्रिय नियोजन केले आणि परिश्रम घेतले. त्यांच्या प्रयत्नांमुळे कागल शहरात हिवतापाबद्दल प्रभावी जनजागृती करण्यात यश आले.