कागलमध्ये दुचाकी-स्विफ्टच्या भीषण धडकेत १३ वर्षीय मुलीचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी; कारमध्ये दारूच्या बाटल्याच्या चर्चेने खळबळ!

कागल (सलीम शेख): कोल्हापूर-कागल मार्गावर आज (दिनांक २८ एप्रिल, २०२५) दुपारी २:३० वाजेच्या सुमारास हॉटेल अशोकसमोर झालेल्या दुचाकी आणि स्विफ्ट कारच्या भीषण अपघातात एका १३ वर्षीय निष्पाप मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. हे तिघेही कणेरीवाडी गावातून निपाणीकडे प्रवास करत होते. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
या हृदयद्रावक घटनेची फिर्याद महेश बाबासो नेजे (वय ३८, व्यवसाय- खाजगी नोकरी, राहणार- कणेरीवाडी, तालुका-करवीर, जिल्हा-कोल्हापूर) यांनी कागल पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, निष्काळजीपणे आणि भरधाव वेगात वाहन चालवणारा आरोपी रितेश प्रकाश जगताप (रा. कागल) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेश नेजे यांचे मेव्हणे रणजित रमेश तंबकदार (वय ३२) हे त्यांच्या स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक MH 09 EX 3824 वरून प्रवास करत असताना, त्यांच्यासोबत त्यांचा तीन वर्षांचा मुलगा पृथ्वीराज रणजित तंबकदार होता. त्याचवेळी मागून आलेल्या स्विफ्ट कार क्रमांक MH12 HZ2176 चा चालक रितेश प्रकाश जगताप याने त्याचे वाहन निष्काळजीपणाने चालवत त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात रणजित तंबकदार आणि त्यांचा लहान मुलगा पृथ्वीराज गंभीररीत्या जखमी झाले आहेत. तर, फिर्यादी महेश नेजे यांची १३ वर्षीय मुलगी गौरी उर्फ आरती महेश नेजे हिचा गंभीर दूखापत होवून मृत्यू झाला. तिच्या अकाली जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, या अपघातानंतर घटनास्थळावरील व्हिडिओ वायरलमधये स्विफ्ट कारमध्ये रिकाम्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. यामुळे कारचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, स्थानिक नागरिकांमध्ये या गाडीमध्ये मावा या अमली पदार्थाचासाठा असल्याची चर्चा रंगली आहे.