जागतिक पुस्तक दिन: वाचनाने जीवन समृद्ध होते – बबन शिंदे

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : “वाचाल तर वाचाल, ग्रंथ हेच आपले खरे मित्र आणि मार्गदर्शक आहेत. वाचनामुळे मनुष्य समृद्ध होतो आणि जीवनाचा खरा अर्थ समजतो. व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी वाचन अत्यंत आवश्यक आहे. समृद्ध जीवनासाठी प्रत्येकाने वाचन केले पाहिजे,” असे विचार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते बबनराव शिंदे यांनी व्यक्त केले.
गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथील दत्तप्रसाद वाचनालयामध्ये जागतिक पुस्तक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ, मुंबईचे अध्यक्ष गजानन कोटेवार होते.
यावेळी बोलताना बबन शिंदे म्हणाले, “जगातील जे कोणी विद्वान झाले, ते केवळ वाचनामुळेच झाले. जागतिक कीर्तीचे विद्वान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तकांवर खूप प्रेम होते. त्यांनी पुस्तकांसाठी स्वतंत्र घर बांधले होते. त्यांनी हजारो पुस्तकांचे वाचन केले. विविध ग्रंथांच्या अभ्यासातूनच त्यांनी जगातील राज्यघटनांचा अभ्यास करून भारताला एक सुंदर राज्यघटना दिली.”
कार्यक्रमाचे अध्यक्ष गजानन कोटेवार यांनी यावेळी पुस्तकांचे महत्त्व विशद केले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे कोषाध्यक्ष राम मेटके, दत्तप्रसाद वाचनालयाचे सचिव बाबासो पाटील, दिपाली चौगुले, ग्रंथपाल कल्पना आदी मान्यवर उपस्थित होते.