महाराष्ट्र ग्रामीण
गोकुळ शिरगाव येथे ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या धडकेत एका व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे.

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास गोकुळ शिरगाव येथे झालेल्या अपघातात मारुती हिंदुराव पाटील (वय ६०, रा. लिंगनूर, ता. कागल) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात त्यांची पत्नी विमल यांना कोणतीही दुखापत झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, अविनाशकुमार धोत्रे (वय ३४, रा. हालसवडे) हे त्यांच्या ट्रॅक्टरमधून (एम.एच. ०९ सीयू ६५७५) क्रशरचे वाळूमिश्रित पीठ आणि कामगार घेऊन फुलेवाडीकडे जात होते. त्याचवेळी मागून आलेल्या मारुती पाटील यांच्या दुचाकीने (एमएच ०९ बीटी ९७५७) ट्रॅक्टरला धडक दिली. या धडकेत पाटील गंभीर जखमी झाले.