किरकोळ कारणावरून तरुणावर प्राणघातक हल्ला; मुरगूडमध्ये खळबळ!

मुरगूड (सलीम शेख ) : कागल तालुक्यातील चिमगाव येथे क्षुल्लक कारणावरून एका ३३ वर्षीय तरुणावर चाकूहल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अजिंक्य भरत एकल गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित आरोपी स्वप्नील संजय करडे (वय १८) आणि त्याचे वडील संजय यशवंत करडे यांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमगावमध्ये अजिंक्य एकल हे त्यांच्या घरी असताना संशयित आरोपी स्वप्नील करडे याने मोठ्या आवाजात मोटरसायकल फिरवली. याबद्दल एकल यांनी त्याला विचारणा केली असता, दोघांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर स्वप्नील आणि त्याचे वडील संजय यांनी मिळून अजिंक्य यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात अजिंक्य गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच मुरगूड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तपास करत आहेत. जखमी अजिंक्य यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती पाहून त्यांना सीपीआर कोल्हापूर येथे हलवण्यात आले आहे.
मुरगूड पोलिसांनी या प्रकरणी स्वप्नील करडे आणि संजय करडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून दोघांनाही ताब्यात घेतले आहे. पुढील तपास मुरगूड पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.