कोल्हापूर महापालिकेसमोर ‘आप’चे खेळण्यांचे आंदोलन; उद्यानांतील मोडक्या खेळण्या बदलण्याची मागणी!

कोल्हापूर (सलीम शेख ) : कोल्हापूर शहरातील उद्यानांमधील मोडक्या खेळण्यांमुळे लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने (आप) कोल्हापूर महानगरपालिकेसमोर खेळणी रचून अनोखे आंदोलन केले. शहरातील ५४ उद्यानांमधील मोडक्या खेळण्या त्वरित बदलण्याची मागणी ‘आप’ने केली आहे.
उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्याने लहान मुले उद्यानांमध्ये खेळण्यासाठी गर्दी करत आहेत. मात्र, अनेक उद्यानांमधील खेळणी मोडकळीस आली आहेत. रंकाळा परिसरातील उद्यानातील घसरगुंडी आणि वॉक-वेला मोठे भगदाड पडले आहे, ज्यामुळे मुलांना खेळणे धोकादायक बनले आहे. या संदर्भात महापालिका प्रशासनाला वारंवार सूचना देऊनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने ‘आप’ने हे आंदोलन केले.
लाल बहादूर शास्त्री उद्यान (सदर बाजार), ताराबाई गार्डन, सिद्धार्थनगरमधील दादासाहेब शिर्के उद्यान, रेड्याची टक्कर येथील हुतात्मा स्मारक, इंदिरा गांधी बालोद्यान (टेम्बलाईवाडी), श्रीराम उद्यान (कसबा बावडा) आणि शेळके उद्यान (मंगळवार पेठ) यांसारख्या उद्यानांमधील मोडक्या खेळण्यांची माहिती ‘आप’च्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमोर मांडली.
आंदोलनस्थळी लहान मुलांनी मोडक्या घसरगुंडीवर खेळून महापालिकेच्या कारभाराचे विडंबन केले. ‘आप’चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई म्हणाले, “उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये लहान मुले मोडक्या खेळण्यांवर खेळताना जखमी झाल्यास, याची जबाबदारी महापालिका प्रशासन घेणार का?” त्यांनी १५ दिवसांच्या आत मोडकी खेळणी काढून नवीन खेळणी बसवण्याची मागणी केली.
या आंदोलनात ‘आप’चे शहराध्यक्ष उत्तम पाटील, सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, मोईन मोकाशी, दुष्यंत माने, विजय हेगडे, अनिल जाधव, समीर लतीफ, राकेश गायकवाड आणि संजय नलवडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.