वडगावात चुलत दिराच्या मदतीने पतीचा खून; मुरगूड पोलिसांनी काही तासांत लावला छडा!

मुरगूड (सलीम शेख ) : कागल तालुक्यातील वडगाव येथे शुक्रवारी (दि. ९) सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास शिवाजी बंडू शिंदे (वय ४७) यांचा खून झाला होता. मुरगूड पोलिसांनी अवघ्या आठ तासांत या खुनाचा रहस्यभेद केला आहे. पत्नी कांचन शिंदे हिने चुलत दीर चंद्रकांत शिंदे याच्या मदतीने अनैतिक संबंधातून हा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी शिंदे हे गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास वडगावच्या चौकात बसले होते. त्यांचा चुलत भाऊ चंद्रकांत धोंडीबा शिंदे याने त्यांना मोटारसायकलवरून पिंपळगाव (ता. भुदरगड) येथे त्यांच्या सासरी नेले. शिवाजी यांची पत्नी कांचन ही देखील माहेरी आली होती. याच ठिकाणी कांचन आणि चंद्रकांत यांनी संगनमत करून महिला बचत गटाकडून घेतलेले पैसे परत न करण्याच्या कारणावरून शिवाजी यांच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर गंभीर वार केले, ज्यात त्यांचा मृत्यू झाला.
यानंतर, कांचन शिंदे आणि चंद्रकांत शिंदे यांनी दुचाकीवरून मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकून हा अपघात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला, अशी कबुली दोघांनीही पोलिसांना दिली आहे. या कबुलीनंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
मुरगूड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, सहाय्यक फौजदार प्रशांत गोजारे, पोलीस अंमलदार बजरंग पाटील, सतीश वर्णे, रविंद्र जाधव, संदीप ढेकळे, संतोष भांदिगरे, राहुल देसाई, राजेंद्र चौगले, अरविंद सोलापुरे, रोहित खाडे आणि महिला पोलीस अंमलदार मिनाक्षी कांबळे यांच्या पथकाने ही कामगिरी आठ तासांत यशस्वी केली.