पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांचा सलोखामंचच्या वतीने सन्मान; सामाजिक सलोख्याच्या कार्याची प्रशंसा!

कोल्हापूर (सलीम शेख ) : कोल्हापूर जिल्हा सामाजिक शैक्षणिक सलोखामंच आणि मुस्लिम बोर्डिंग कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी सलोखामंचच्या सदस्यांनी फुलारी यांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सन्मान केला.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सामाजिक सौख्य आणि सलोखा वाढवण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या स्तरावर सुनिल फुलारी यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत सलोखामंचने हा सन्मान आयोजित केला होता. या भेटीदरम्यान बोलताना पोलीस महानिरीक्षक फुलारी यांनी सामाजिक, कौटुंबिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील सलोखामंचच्या कार्याची प्रशंसा केली. धार्मिक आणि जातीय सलोखा वाढवण्यासाठी मुस्लिम बोर्डिंग सलोखामंच उत्तम काम करत आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
संस्थेचे अध्यक्ष कादर मलबारी यांनी सलोखामंचच्या माध्यमातून जातीय सलोखा राखणे आणि कौटुंबिक वाद मिटवून समाजातील चुकीच्या प्रथा-परंपरांना दूर करण्याचे कार्य केले जात असल्याची माहिती दिली. यासाठी प्रशासनाच्या हाकेला २४ तास प्रतिसाद देण्याची ग्वाही त्यांनी दिली. सलोखामंचचे उपाध्यक्ष सलीम अत्तार सर यांनीही आपले विचार व्यक्त करताना संपूर्ण जिल्ह्यातील शांतता अबाधित राखल्याबद्दल पोलीस प्रशासनाचे आभार मानले. त्यांनी विशेषतः प्रभारी जिल्हा पोलीस प्रमुख निकेश खाटमोडे पाटील, पोलीस उपअधीक्षक इचलकरंजी समीरसिंह साळवे आणि पोलीस उपअधीक्षक करवीर अजित टीके यांच्या कार्याचे कौतुक केले.
या सन्मान सोहळ्यादरम्यान हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे गावचे सुपुत्र आयुबखान मुल्ला यांचाही सत्कार करण्यात आला. त्यांना ३९ वर्षांच्या उत्कृष्ट सेवेसाठी महामहिम राष्ट्रपती महोदया यांच्या हस्ते राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले आहे.
या सदिच्छा भेटीसाठी बाबासाहेब काझी, हाफिज मुसा सनदी, समीर अत्तार, शकील नगारजी, अरिफ तांबोळी, इम्रान मुजावर यांसह जिल्ह्यातील अनेक सदस्य उपस्थित होते. या भेटीमुळे पोलीस प्रशासन आणि सामाजिक संस्था यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.