महाराष्ट्र ग्रामीण

उजळाईवाडी-तामगाव रस्त्यासाठी ग्रामस्थांचे जनआंदोलन; विमानतळावर ठिय्या, लोकप्रतिनिधींची मध्यस्थी!

तामगाव (सलीम शेख ) : उजळाईवाडी ते तामगाव हा रस्ता पूर्ववत सुरू करावा किंवा तातडीने पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी आज तामगावमधील ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन छेडले. ग्रामस्थांनी गावात निषेध फेरी काढत सर्व व्यवहार बंद पाडले. त्यानंतर आक्रमक ग्रामस्थांनी थेट विमानतळावर धडक मारून जोरदार निदर्शने केली आणि उन्हात ठिय्या आंदोलन केले.

भारत-पाकिस्तानमधील तणावपूर्ण परिस्थिती आणि सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळाला हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे विमानतळाची सुरक्षा तसेच अपूर्ण तांत्रिक कामे पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उजळाईवाडी ते तामगाव हा विमानतळावरून जाणारा रस्ता शनिवार मध्यरात्रीपासून पूर्णपणे बंद केला आहे. मात्र, अद्याप कोणताही पर्यायी रस्ता उपलब्ध न झाल्याने तामगावमधील नागरिक संतप्त झाले आहेत.


आज सकाळी दहा वाजता ग्रामपंचायतीसमोर मोठ्या संख्येने ग्रामस्थ एकत्र जमले. त्यांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत उजळाईवाडी-तामगाव रस्ता त्वरित सुरू करण्याची मागणी केली. त्यानंतर ग्रामस्थांनी गावातील प्रमुख मार्गांवरून निषेध फेरी काढली. हातात निषेधाचे फलक घेतलेल्या ग्रामस्थांनी शासनाच्या धोरणांवर तीव्र नापसंती व्यक्त केली.


गावातील फेरी संपल्यानंतर सर्व ग्रामस्थ मोटरसायकलवरून विमानतळावर पोहोचले. त्यांनी खोदकाम करून बंद केलेल्या रस्त्याच्या ठिकाणी जोरदार निदर्शने केली आणि शासनाचा निषेध नोंदवला. संतप्त ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना तातडीने घटनास्थळी येण्याचा आग्रह धरला. भर उन्हात तब्बल तीन तास ग्रामस्थांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले, ज्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.


दरम्यान, आमदार अमल महाडिक यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यांनी बंद केलेल्या रस्त्याची पाहणी केली आणि ग्रामस्थांच्या भावना जाणून घेतल्या. आमदार महाडिक यांनी सांगितले की, पर्यायी रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असून त्यासाठी २७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी एक कोटी रुपये वर्ग करण्यात आले असून उर्वरित ९४ कोटी रुपयांची गरज आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली असून, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनाही निवेदन दिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून, दुपारी अडीच वाजता त्यांच्यासोबत ग्रामस्थांची बैठक आयोजित करून यातून मार्ग काढण्याची ग्वाही त्यांनी आंदोलकांना दिली.


माजी आमदार ऋतुराज पाटील यांनीही आंदोलनस्थळी भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
स्थानिक उजळाईवाडी, तामगाव तलाव आणि बेग परिसरातील नागरिकांनी सांगितले की, रस्ता बंद झाल्यामुळे त्यांना फिरून एमआयडीसी-गोकुळ शिरगाव-उजळाईवाडी मार्गे जाण्यासाठी सुमारे ९ किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागत आहे. तसेच, शाळा, दवाखाने, क्लासेस आणि भाजीपाला खरेदीसाठीही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या दोन दिवसांपासून रस्ता बंद असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.


या आंदोलनात विश्वास तरटे, महेश पिंपळे, अमोल गवळी, अभिजित मोहळकर, हेमंत पाटील, विकी मुजावर, भाईजान अन्सारी, औदींन चौगुले, बाजीराव गंगाधर, बाळू गुरव, दीपक देशमुख, अनिल पाटील, दीपक जाधव, माणिक जोंधळेकर, तानाजी सासने, संपत सासने, विठ्ठल पुजारी, राजू पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी गोकुळ शिरगाव पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. आता जिल्हाधिकाऱ्यांसोबत होणाऱ्या बैठकीत या आंदोलनावर तोडगा निघतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button