एस.टी. चालकाला पोलिस दाम्पत्याने मारहाण, नावली येथे घडला प्रकार!

कोडोली (सलीम शेख ) : एस.टी. बसला ओव्हरटेक करण्याची संधी न दिल्याच्या कारणावरून विचारणा करणाऱ्या बस चालकाला एका पोलिस दाम्पत्याने मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. १२ मे) दुपारी पावणे दोनच्या सुमारास पन्हाळा तालुक्यातील नावली येथे घडली. याप्रकरणी आसिफ कलायगार आणि त्यांची पत्नी हाफिबा आसिफ कलायगार यांच्याविरोधात कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मलकापूर आगाराची एस.टी. बस घेऊन चालक नितीन शिरगावकर हे रविवारी कोल्हापूरहून मलकापूरकडे निघाले होते. वाघबीळपासून आरोपी आसिफ कलायगार हे त्यांच्या पत्नीसह चारचाकी गाडीतून मलकापूरच्या दिशेने जात होते. बसचालक शिरगावकर यांनी अनेकवेळा ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, परंतु कलायगार यांनी त्यांना संधी दिली नाही.
नावली येथे रस्ता रुंद झाल्यावर बसचालकाने कलायगार यांना ‘साईड द्यायची नाही का?’ असे विचारले. यावर कलायगार आणि त्यांच्या पत्नीने बसचालकाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि नंतर मारहाण केली. बसमधील प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करत वाद शांत करण्याचा प्रयत्न केला.
या घटनेची माहिती बसचालक शिरगावकर यांनी रविवारी कोडोली पोलिसांना दिली होती. मात्र, पोलिसांनी त्यावेळी चालकाविरोधात एनसीआर दाखल केला होता. दरम्यान, सोमवारी रात्री पोलिसांनी आरोपी दाम्पत्य कलायगार यांना ताब्यात घेतले आहे. शाहूवाडीचे पोलिस उपअधीक्षक आप्पासाहेब पवार यांनी रात्री कोडोली पोलिस ठाण्यात या घटनेची माहिती घेतली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.