भीषण अपघात: डंपरच्या धडकेत नामांकित मेहंदी आर्टिस्टचा जागीच मृत्यू!

कोल्हापूर (सलीम शेख ) : टेंबलाई उड्डाणपुलाजवळ शुक्रवारी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दिनेशसिंग साहबसिंग नायक (वय ३३, रा. टाकाळा, मूळ रा. सादाबाद, जि. हातरस, उत्तरप्रदेश) या नामांकित मेहंदी आर्टिस्टचा जागीच मृत्यू झाला. महापालिकेच्या कचरा वाहून नेणाऱ्या डंपरने दुचाकीवरून रस्ता ओलांडत असताना दिनेशसिंग नायक यांच्या दुचाकीला धडक दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेशसिंग नायक हे टाकाळा परिसरात खोली घेऊन राहत होते आणि सकाळी ११:३० च्या सुमारास कामासाठी बाहेर पडले होते. टेंबलाई उड्डाणपुलाजवळ रस्ता ओलांडत असताना कसबा बावडा झूम प्रकल्पाकडे जाणाऱ्या महापालिकेच्या डंपरने त्यांना समोरून धडक दिली. या धडकेत ते तोल जाऊन खाली कोसळले आणि डंपरचे चाक त्यांच्या पोटावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी डंपरचालक अमित आकाराम पाटील (वय ३५, रा. प्रगतीनगर, पाचगाव) याच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाहतूक विस्कळीत आणि हळहळ व्यक्त
या अपघातामुळे उड्डाणपुलावरील वाहतूक सुमारे एक तास खोळंबली होती. अपघातानंतर डंपर त्याच ठिकाणी थांबून होता. माहिती मिळताच शाहूपुरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह सीपीआर येथे शवविच्छेदनासाठी पाठवला आणि डंपर ताब्यात घेतला. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
दिनेशसिंग नायक हे सासने मैदान परिसरातील एका मार्टमध्ये मेहंदी आर्टिस्ट म्हणून काम करत होते आणि ते एक नावाजलेले कलाकार होते. त्यांच्या निधनाने कोल्हापुरात हळहळ व्यक्त होत आहे. आयुष्यात यशाच्या शिखरावर पोहोचत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
अपघाताची माहिती मिळताच कोल्हापुरातील त्यांचे मित्र आणि नातेवाईक सीपीआरमध्ये जमा झाले होते. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुले असा परिवार आहे.