पुणे-बंगळूर महामार्गावर दुचाकी घसरून अपघात; गांधीनगरचे तरुण किरकोळ जखमी, रुग्णवाहिकेच्या तत्परतेचे कौतुक!

टोप संभापूर (सलीम शेख ) : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर संभापूर बिरदेव मंदिरासमोर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात गांधीनगर, कोल्हापूर येथील ओम शिखाने (वय १८) आणि करण डांगे (वय १९) हे दोन तरुण किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेनंतर राष्ट्रीय महामार्ग रुग्णवाहिकेने दाखवलेल्या तत्परतेमुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टोप संभापूर बिरदेव मंदिरासमोरून जात असताना ओम शिखाने आणि करण डांगे यांच्या दुचाकीला अपघात झाला. या अपघातात दोघेही किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग रुग्णवाहिकेला तात्काळ वर्दी मिळाली.
वर्दी मिळाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिका चालक अझरुद्दीन अरब, डॉक्टर ऋतुजा कांबळे आणि सुनील पाटील यांच्या पथकाने कोणतीही वेळ न घालवता अपघातग्रस्तांना तात्काळ डी.वाय. पाटील हॉस्पिटल, कदमवाडी येथे उपचारासाठी दाखल केले.
रुग्णवाहिकेने काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचून जखमींना त्वरित उपचार दिल्याचे पाहून उपस्थित नागरिकांनी रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले. अझरुद्दीन अरब, डॉक्टर ऋतुजा कांबळे आणि सुनील पाटील यांच्या या तत्पर कार्यामुळे जखमींना वेळेत उपचार मिळाले आणि पुढील धोका टळला. त्यांच्या या कामाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.