खासदार धैर्यशील माने यांच्या प्रयत्नांमुळे हुपरी अंबाबाई मंदिरातील पवळ्याचे काम मार्गी

हुपरी (सलीम शेख ) : कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार धैर्यशील माने यांच्या खासदार निधीतून हुपरी येथील अंबाबाई मंदिरात बांधण्यात आलेल्या पवळ्याच्या कामासाठी निधी मंजूर झाल्याबद्दल समस्त हुपरीवासीय आणि अंबाबाई भक्तांकडून त्यांचे मनापासून अभिनंदन करण्यात आले आहे. खासदार धैर्यशील माने आणि त्यांचे मुंबई येथील स्वीय सहाय्यक जयंत पवार यांच्या प्रयत्नांमुळे हे काम मार्गी लागल्याने ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत.
हुपरी अंबाबाई भक्त मंडळ आणि गावातील ग्रामस्थांच्या वतीने या पवळ्याच्या कामाचे होमहवन आणि वास्तुशांती समारंभ नुकताच थाटामाटात पार पडला. यावेळी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
या निधीमुळे मंदिराच्या विकासाला हातभार लागला असून, भाविकांसाठी अधिक सोयीस्कर वातावरण निर्माण झाले आहे, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. खासदार माने यांच्या या दूरदृष्टीबद्दल आणि गावाच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल हुपरीवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे.