मे महिन्यात गगनबावड्यात विक्रमी पाऊस; निसर्गरम्य वातावरणाने पर्यटकांना भुरळ, मात्र प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा!

गगनबावडा, कोल्हापूर (विलास पाटील): मे महिन्याच्या सुरुवातीलाच गगनबावडा परिसरात वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे अक्षरशः पावसाने धुमाकूळ घातला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद गगनबावडा येथे झाली असून, गेल्या २४ तासांत येथे १०२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे गगनबावडा हे सध्या जिल्ह्यातील सर्वाधिक पर्जन्यमान असलेले ठिकाण बनले आहे.
सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे गगनबावड्याने एक निसर्गरम्य आणि विलक्षण रूप धारण केले आहे. सर्वत्र पसरलेली हिरवळ, मनमोहक घाट, खळाळणाऱ्या नद्या आणिCधे उंच डोंगर यामुळे हे ठिकाण पर्यटकांचे मुख्य आकर्षण बनले आहे. निसर्गप्रेमी आणि साहसप्रेमींना गगनबावडा येथील वातावरण विशेषतः भुरळ घालत असून, मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी गर्दी करत आहेत.
सध्या सुरू असलेल्या या पावसामुळे गगनबावड्याचे सौंदर्य अधिकच खुलले असून, पर्यटनासाठी हे एक आदर्श ठिकाण बनले आहे. मात्र, हवामान विभागाने पुढील दोन दिवस मोठा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना आणि पर्यटकांना अशा धोकादायक ठिकाणी जाण्यास मनाई केली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पर्यटकांनी गगनबावड्याच्या निसर्गाचा आनंद लुटताना योग्य ती खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.