करवीर पोलीस दलाची मोठी कारवाई: ‘जोकर’ उर्फ अजय भिलुगडे पिस्तूलासह गजाआड!

मोरेवाडी (सलीम शेख) : करवीर पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत, अजय उर्फ जोकर सुरेश भिलुगडे (वय २९, रा. मोरेवाडी ग्रामपंचायतजवळ, मोरेवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर) याला गावठी पिस्तूल आणि मोबाईलसह अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एकूण ५१,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
करवीर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात, यापूर्वी ताब्यात घेण्यात आलेल्या दोन आरोपींनी आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकाने चौकशीदरम्यान पिस्तूल देणाऱ्या व्यक्तीचे नाव अजय उर्फ जोकर सुरेश भिलुगडे असल्याचे सांगितले होते. या माहितीच्या आधारे करवीर पोलीस भिलुगडेच्या शोधात होते.
पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, अजय उर्फ जोकर सुरेश भिलुगडे हा चित्रनगरीकडून मोरेवाडी गावातील त्याच्या घराकडे येणार होता. या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी मोरेवाडी स्मशानभूमीत सापळा रचला. काल, शुक्रवार, दिनांक ३०/०५/२०२५ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अजय उर्फ जोकर सुरेश भिलुगडे चित्रनगरीकडून मोरेवाडी गावाच्या दिशेने चालत येत असताना दिसला.
रेकॉर्डवरील आरोपी असल्याने पोलिसांनी त्याला तात्काळ ओळखले आणि ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या कमरेला एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि उजव्या खिशात कीपॅडचा मोबाईल आढळून आला. पोलिसांनी सदर आरोपीला जप्त केलेल्या मालासह ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस दलाने अवैध शस्त्रांच्या विरोधात कठोर पाऊल उचलल्याचे दिसून आले आहे.