स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी ‘इंडिया’ आघाडी सज्ज; कोल्हापुरातून एकजुटीचा संदेश!

कोल्हापूर (सलीम शेख) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘इंडिया’ आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक आज (शुक्रवारी) कोल्हापुरातील अजिंक्यतारा येथे पार पडली. या बैठकीत आगामी सर्व निवडणुका ताकदीने लढवण्याचा आणि ‘इंडिया’ आघाडीच्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचा निर्धार सर्वच नेत्यांनी व्यक्त केला.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्ह्याचे नेते आमदार सतेज पाटील यांनी, प्रत्येक तालुक्यात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत चर्चा करावी, तसेच आपापल्या भागांत सर्वांना सोबत घेऊन लढण्याची तयारी करावी, असे आवाहन केले. खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेश दिले.
या बैठकीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संजय पवार, विजय देवणे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे व्ही.बी. पाटील, आर. के. पोवार, सतिशचंद्र कांबळे, राहुल पाटील, सचिन चव्हाण, सरलाताई पाटील, भारती पोवार, सुलोचना नायकवडी, चंद्रकांत यादव, सुनील मोदी, दिलीप पोवार यांच्यासह अनेक प्रमुख नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ‘इंडिया’ आघाडीची एकजूट आणि तयारी अधिक मजबूत झाल्याचे दिसून आले.