सारथी पीएच.डी. संशोधकांची शिष्यवृत्ती रखडली; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून तातडीने देण्याची मागणी!

कोल्हापूर (सलीम शेख ) : कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ विद्यार्थ्यांना ‘सारथी’च्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रौ-आयएएस ट्रेनिंग सेंटरशेजारी उपकेंद्र सुरू होऊन सारथी योजनांचा फायदा घेण्यासाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांचा मार्ग मोकळा झाला असतानाच, आता पीएच.डी. संशोधकांची शिष्यवृत्ती रखडल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन, प्रलंबित शिष्यवृत्तीची रक्कम तातडीने देण्याची मागणी केली आहे.
सारथी संस्थेकडे २०१९ ते २०२५ या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यातील ४२७ पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. या विद्यार्थ्यांना पाच वर्षांसाठी शिष्यवृत्ती देण्याची तरतूद करण्यात आली आहे. यानुसार, पहिल्या दोन वर्षांसाठी दरमहा ३७ हजार रुपये आणि १२ हजार रुपये आकस्मिक निधी, तर उर्वरित तीन वर्षांसाठी दरमहा ४२ हजार रुपये विद्यावेतन देण्याचे निश्चित झाले आहे.
मात्र, जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४ या कालावधीतील विद्यावेतन, तसेच जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ या कालावधीतील घरभाडे भत्ता आणि आकस्मिक निधी अद्यापही या विद्यार्थ्यांना मिळालेला नाही, ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे निदर्शनास आले आहे.
विशेष म्हणजे, २० मे २०२५ रोजीच्या परिपत्रकात शासनाने ‘सारथी’ला १५३ कोटी रुपये निधी मंजूर केला असल्याचे समजते. तरीही, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) पीएच.डी. संशोधकांना छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय अधिछात्रवृत्ती शिष्यवृत्तीची रक्कम अद्याप मिळालेली नाही. यामुळे या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केला आहे.
पक्षाने मागणी केली आहे की, या पीएच.डी. संशोधकांची प्रलंबित अधिछात्रवृत्ती आणि शिष्यवृत्तीची रक्कम त्वरीत वितरित करण्यात यावी जेणेकरून त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये आणि त्यांचे संशोधन कार्य थांबू नये.