कागलमधील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोरच्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य; अपघाताची भीती, नागरिक संतप्त!

कागल (सलीम शेख) : कागल शहरातील एसटी स्टँडजवळील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोरील रस्त्यावर सध्या मोठमोठे खड्डे पडले असून, यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या खड्ड्यांमधील दगडगोटे रस्त्यावर सर्वत्र पसरल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी पसरली आहे, आणि हे खड्डे तातडीने बुजवावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या रस्त्यावर अशी परिस्थिती असल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांना आणि चारचाकी वाहनचालकांना नाहक त्रास सहन करत प्रवास करावा लागत आहे. अनेक वेळा खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज न आल्याने छोटे अपघात घडले आहेत, तर मोठे अपघात होण्याची शक्यताही बळावली आहे.
रस्त्यावर पसरलेले खडे दुचाकी घसरण्याचे प्रमुख कारण बनले आहेत.? पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांची खोली आणि स्थितीचा अंदाज येत नाही, ज्यामुळे धोका आणखी वाढतो. या गंभीर समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाकडे वारंवार सांगून ही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. “या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे दुखण्याला आमंत्रण देण्यासारखे आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष घालून हे खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त करावा, नाही तर तीव्र आंदोलन करावे लागेल,” अशी प्रतिक्रिया एका स्थानिक नागरिकाने दिली.
नागरिकांच्या वाढत्या मागणीमुळे आणि अपघाताच्या वाढत्या धोक्यामुळे प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोरील रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.