महात्मा फुले जन आरोग्य आणि आयुष्मान भारत योजनांचा विस्तार: आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख होणार!

कोल्हापूर (सलीम शेख ) : १८ जून २०२५: महाराष्ट्रात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MPJAY) आणि आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) अंतर्गत दिल्या जाणाऱ्या रुग्णालयीन सेवा अधिक प्रभावी आणि लोकाभिमुख करण्यावर आज भर देण्यात आला. या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुंबईतील वरळी येथील राज्य कामगार विमा रुग्णालयात एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत रुग्णांना मिळणाऱ्या सेवेची गुणवत्ता वाढवणे, उपचार प्रक्रिया अधिक जलद करणे, सुपरस्पेशालिटी सुविधा उपलब्ध करून देणे आणि वेळेवर उपचार मिळण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिल्हा शासकीय रुग्णालये आणि इतर सक्षम संस्थांना या योजनेत लवकरात लवकर समाविष्ट करण्याचे निर्देश दिले.
या योजनांचा लाभ केवळ मर्यादित घटकांपर्यंत न ठेवता, स्वस्त धान्य दुकान चालक आणि सरकार सेवा केंद्र चालक यांसारख्या घटकांना देखील यामध्ये समाविष्ट करण्याचे आदेश देण्यात आले. यासाठी पात्र लाभार्थ्यांची माहिती संकलित करून त्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यरत असलेल्या अंगीकृत रुग्णालये, आरोग्य मित्र, क्षेत्रीय अधिकारी, जिल्हा समन्वयक आणि मुख्यालयातील कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना “बाळासाहेब ठाकरे पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात यावे आणि त्यासाठी लवकरच सोहळा आयोजित करण्यात यावा, असे निर्देशही पालकमंत्री आबिटकर यांनी दिले.
या सर्व निर्णयामागचे मुख्य उद्दिष्ट नागरिकांना दर्जेदार, वेळेवर आणि सुलभ आरोग्यसेवा मिळावी हेच आहे. यामुळे राज्यातील आरोग्य सेवेत महत्त्वपूर्ण सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.