गोकुळ शिरगावच्या संगीता पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री वृद्धाश्रमात ब्लँकेट वाटप!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : डी.एम.आर. फाउंडेशन संचलित स्वामी समर्थ सेवा व बालसंस्कार केंद्राच्या उपाध्यक्षा आणि गोकुळ शिरगाव ग्रामपंचायत सदस्या संगीता यशवंत पाटील (प्रिती ग्रुप अध्यक्षा) यांनी आपला वाढदिवस मातोश्री वृद्धाश्रम, चुंबकडी, कोल्हापूर येथे वृद्धांना ब्लँकेट वाटप करून साजरा केला. या वेळी वृद्धाश्रमातील सर्व रहिवाशांना ७५ ब्लँकेट्सचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी मातोश्री वृद्धाश्रमाच्या अध्यक्षा वैशाली राजशेखर, सूर्यप्रभा चिटणीस, संगीता पाटील यांचे पती यशवंत पाटील, मुलगा प्रथमेश पाटील, आई विमल पाटील, भाऊ रवींद्र पाटील आणि डी.एम.आर. फाउंडेशनचे संस्थापक रणजीत दुर्गुळे आदी उपस्थित होते.
या वेळी बोलताना संगीता पाटील म्हणाल्या, “माझा वाढदिवस इथे येऊन साध्या पद्धतीने साजरा करायला मिळाला आणि वृद्धाश्रमातील सर्वांसोबत हा क्षण साजरा करण्याचे भाग्य मला लाभले असे मी समजते.” त्यांनी सर्वांना ही एक आठवण माझ्यासाठी भेटच आहे म्हणून याबद्दल त्यांचे मनापासून आभार.
डी.एम.आर. फाउंडेशनचे संस्थापक रणजीत दुर्गुळे यांनी वृद्धाश्रमातील सर्वांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी यशवंत पाटील यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. मातोश्री वृद्धाश्रमाच्या अध्यक्षा वैशाली राजशेखर यांनी वृद्धाश्रमाविषयी माहिती दिली, तर येथे राहत असलेल्या वृद्ध महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले.
हा उपक्रम संगीता पाटील यांच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवणारा ठरला.